पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचे आवाहन
प्रति,
सर्व समाजसेवी संस्था, संघटना, मंडळे व नागरिकबंधू,
विषय : पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचे आवाहन
प्रिय बांधवांनो,
आपल्या डोळ्यांसमोर निसर्गरूपी आपत्तीने आपल्या गावोगावी हाहाकार माजवला आहे. पावसाच्या प्रलयकारी तडाख्यामुळे असंख्य घरे कोसळली, संसार उध्वस्त झाले, शेतकरी बांधवांची शेती वाहून गेली. आज आपल्या अनेक भगिनी-भावांना उघड्यावर रात्र काढावी लागत आहे. लहान मुले उपाशी झोपतात, वृद्धांना औषधांचा आधार नाही, मातांना आपल्या लेकरांचे डोळ्यातले अश्रू पुसायलाही हात रिकामे आहेत.
या दुःखाच्या क्षणी आपण सारेच त्यांचे आधारस्तंभ बनलो, तरच त्यांचे आयुष्य पुन्हा उभे राहील. धर्म, जात, पक्ष, संस्था यापलीकडे जाऊन एकच मानवतेचा धागा धरून आपण सर्वांनी एकत्र उभे राहायची वेळ आज आली आहे.
मदत कशी करू शकतो?
- अन्नधान्य, पिण्याचे पाणी व तयार अन्नपदार्थ
- कपडे, चादरी, ब्लँकेट्स
- जीवनावश्यक औषधे व स्वच्छता साहित्य
- आर्थिक मदत
आपण दिलेला प्रत्येक घास, प्रत्येक रुपया, प्रत्येक थेंब अश्रू पुसण्यासाठी उपयोगी पडेल. पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावरचे हसू परत आणण्याची हीच खरी वेळ आहे.
म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून, आपल्या कुटुंबीयांच्या माध्यमातून व स्वतःहूनही या जनहितकार्यात हातभार लावावा, ही मनापासून विनंती.
चला, आज आपण सारे “एक हात मदतीसाठी – एक जीव वाचवण्यासाठी” या भावनेने पूरग्रस्तांसोबत उभे राहूया.
आपला,
डॉ जाधव,
संचालक
+91-8446414658